चिंचवडमध्ये 13 मतदान केंद्रे संवेदनशील

0
310

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीत 510 मतदान केंद्रे असून यामध्ये 13 केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध कामासाठी 561 पथके तयार केली आहेत.

चिंचवड विधानसभा मतदार संघाची निवडणूक तिरंगी होत आहे. या निवडणुकीत भाजपकडून अश्‍विनी जगताप, महाविकास आघाडीकडून विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अपक्ष राहूल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी अवघे पाच दिवस बाकी असताना प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षांचाही जोरदार प्रचार सुरू आहे.

26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारसंघात 510 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये 13 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मतदार संघातील काही प्रभागामध्ये रूट मार्च केला. काही केंद्र संवेदनशील असली तरी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे.

केंद्रासाठी नेमलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या अनुषंगाने घ्यावयाची विशेष काळजी, सादर करायचे अहवाल आदींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.