देश हुकूशाहीकडे निघालाय – संजय राऊत

0
153

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामधील पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. एकीकडे शिंदेगट बँड-बाजासह आपला विजय साजरा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे गट, भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. तसेच, लढत राहू असा इशाराही त्यांनी दिला.

“निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते. ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच. खोके चमत्कार झाला! लढत राहू”, असं ट्वीट करत संजय राऊतांनी निवडणूक आयोग, शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी दोन्हीही गटांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु होते. त्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला या फायदा नक्कीच होणार आहे.