…म्हणून महापालिका कर्मचारी 14 मार्च पासून संपावर जाणार

0
282

पिंपरी, दि.१७ (पीसीबी) – राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांमधील रिक्त जागांवर खाजगी कंत्राटाऐवजी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी 14 मार्चपासून सर्व कर्मचारी संपावर जातील असा इशारा महाराष्ट्र राज्य महापालिका- नगरपालिका- नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनने दिला.

फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून संप आहे. त्यांचा आम्हाला पाठिंबा असून आम्हीही संप पुकारत आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न 2024 पर्यंत न सोडविणाऱ्यांना किंवा त्याला विरोध करणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नाही. 2005 पुर्वीची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना पुर्ववत चालू करावी. कायमस्वरुपी सफाई व इतर सेवेतील ठेकेदारी पद्धत तातडीने बंद करून आकृतीबंधामध्ये कायम कामगारांची पदे निर्माण करावी.

राज्यातील बालवाडी व अंगणवाडी सेविकांना सेवेत कायम करून घ्यावे. ठेकेदारांकडील कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ द्यावे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करून वारसांना नोकरीत समाविष्ट करावे. सहावा व सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम द्यावी. अनुकंपा तत्त्वावरील वारसांना तातडीने सेवेत सामवून घ्यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे द्यावीत. शिक्षक मतदार संघाप्रमाणे सेवक मतदारसंघ तयार करावा. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सेवेत 10 टक्के कोटा राखीव ठेवावा, असे ठराव करण्यात आले.’’