राष्ट्रवादीसोबतच्या सरकारबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली – चंद्रशेखर बावनकुळे

0
338

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ पुन्हा भाजपमध्ये

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादीसोबत शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसारच भाजपने सरकार स्थापन केले होते. याची वस्तुस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. जे खरे आहे हे बोलण्यात काही बिघडले. फडणवीस यांच्या स्वभावात असत्यपणा नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दरम्यान,पुनावळे येथील माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात आले होते. आकुर्डीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रवक्ते एकनाथ पवार, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.

सर्वजण पक्षाच्या उमेदवाराचे काम करत आहेत. विरोधात कोण काम करत नाही. अपक्ष उमेदवाराचे काम करणा-यांवर पक्ष कारवाई करेल. पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय नेते येत नसतात. राज्यातील नेतेच प्रचार करतात असे सांगत बावनकुळे म्हणाले, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाहीत. बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा-तोटा कोणाला होईल. यामध्ये आम्हाला काही रस नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आज (गुरूवारी) पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओव्हाळ यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 21 एप्रिल 2019 रोजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पोटनिवडणुकीच्या धामधूमीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.