भाजपचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर मांडा – नाना काटे

0
185

चिंचवड (पीसीबी)। पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची पाच वर्ष सत्ता होती. मात्र, या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. भाजपचा हा भ्रष्टाचार जनतेसमोर प्रभावीपणे मांडा. लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेल्या भाजपला पोटनिवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी कार्यकर्त्यांना केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा सोमवारी (दि. 13) वाल्हेकरवाडीत संयुक्त मेळावा पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सचिन अहिर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई, आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी आमदार विलास लांडे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, योगेश बहल यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेतील भाजपच्या सत्तेमुळेच शहरवासियांना गेल्या साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरातील आज विविध सोसायट्यांमध्ये ‘नो वॉटर नो वोट’ असे फलक लागत असल्याचे सांगत काटे पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कै. रामकृष्ण मोरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यामुळेच झाला आहे. आपण नगरसेवक म्हणून गेल्या 20 वर्षांपासून पिंपळे-सौदागर भागाचे प्रतिनिधित्व करत आहोत. पक्षीय भेदभाव न करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या माध्यमातून पिंपळे-सौदागर ‘स्मार्ट वॉर्ड’ म्हणून नावारूपाला आलेला परिसर आहे. त्यामुळेच या भागातील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले सुशिक्षित मतदारही आपल्याला भरघोस मतदान करतात.
पिंपळे सौदागरसोबतच आता चिंचवड विधानसभा मतदार संघालाही स्मार्ट बनविण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने मला उमेदवार बनविले आहे. चिंचवडच्या विकासासाठी आणि स्वच्छ कारभारासाठी जनतेने आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहनही नाना काटे यांनी यावेळी केले.