२० फेब्रुवारीला कार्यकर्ता प्रबोधन शिबिर

0
374

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) – राष्ट्र उभारणीसाठी तळमळीचे, नि:स्वार्थी आणि देशप्रेमी कार्यकर्ते निर्माण व्हावे या उद्देशाने आशिया मानवशक्ती विकास संस्था (पुणे) आणि आदर्शगाव हिवरेबाजार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता हिवरेबाजार, तालुका-जिल्हा अहमदनगर येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस असून पद्मश्री पोपटराव पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजिका ताराबाई गोडगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते शिबिराच्या स्वागताध्यक्षपदी राहतील. सकाळी ११:०० वाजता ‘पाठ्यपुस्तकातील कवी प्रत्यक्ष भेटीला…’ या पहिल्या सत्रात शालेय अभ्यासक्रमातील निवडक कवी कवितांचे तसेच दुपारी १२:०० वाजता कविराज उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत ‘खेड्यातील कविता’ या दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविता सादरीकरण होईल. दुपारी २:३० वाजता नदी सुधार, कष्टकरी कामगार, वृक्षलागवड आणि जोपासना, सामाजिक कार्य, साहित्य-शिक्षण-संस्कृती आणि कामगार संघटन या वैविध्यपूर्ण विषयांवर मार्गदर्शक वक्ते विचार मांडतील.

शिबिराच्या समारोप प्रसंगी सुनील उकिर्डे (रंगनाथ गोडगे-पाटील सामाजिक कार्यकर्ता), सुभाष उमाप (यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण) तसेच विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्चमाध्यमिक – राजुरी (स्वामी विवेकानंद संस्कारक्षम शाळा) आणि किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉइज युनियन – कोथरूड (नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विनाशुल्क असलेल्या या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.