राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याला होणार अटक

0
295

कोल्हापूर, दि. ८ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांच्या मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मुश्रीफांना धमक्या देण्यात येत असून राजकीय हेतूने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जामीनासाठी मुश्रीफांच्या मुलांनी न्यायालयात अर्ज केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यानंतर सक्तवसुली संचलनालयाने (ED) मुश्रीफांच्या घरावर छापेमारीही केली होती. गेल्या २१ दिवसांत ईडीने मुश्रीफांशी दोन ठिकाणांवर छापेमारी केली. त्यांचे कोल्हापुरातील निवासस्थान, त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेले माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती.

गेल्या महिन्यात ११ जानेवारीलाही ईडीने पुण्यातही मुश्रीफांशी संबंधित चार ठिकाणांवर छापेमारी केली. शिवाजीनगर येथील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच कोरेगाव पार्कमधील त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या कार्यालयावरही कारवाई केली होती. याशिवाय १ फेब्रुवारीलाही ईडीने हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली होती.

३० तासांच्या छापेमारीनंतर ईडीने बँकेच्या पाच अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी केली होती. यादरम्यान ईडीने मुश्रीफांवर ३५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच प्रकरणा मुश्रीफ यांना अटक होण्याची भिती त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी आता मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. या अर्जावर आता १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.