थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महानगरपालिकेची अनोखी ‘मीम स्पर्धा’

0
157

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – सध्या झपाट्याने लोकप्रिय झालेल्या मीमने तरुणाईवर गारुड केले आहे. एखाद्या व्यवसायापासून ते चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी मीमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय. हसत-खेळत, चिमटे काढत व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या या मीमचा वापर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सुरू केलाय.

सोशल मीडिया युजर्ससाठी कर संकलन विभागाने ‘#मी_थकबाकीदार’ या मीम स्पर्धेचे आयोजन केले असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मराठी मीम मॉक्स यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या भन्नाट उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठी मर्यादित न राहता आता पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही सुरू झाली आहे. मीम स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांवरून ते दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. वारंवार आवाहन करूनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यातच कर संकलन विभागाने आता थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मीम स्पर्धा आयोजित करून एक अनोखा उपक्रमही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. या उपक्रमाचे सोशल मीडिया युजर्सकडून कौतुक करण्यात येत आहे.

सोशल मीडियावरील बहुतांश युजर्स या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. अतिशय कल्पनात्मक मीम बनवत #मी_थकबाकीदार स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची चर्चा आता केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित न राहता, सर्वसामान्य नागरिकांमध्येही सुरू झाली आहे.

देशातील पहिली महानगरपालिका!

मालमत्ता कर वसुलीसाठी मीम स्पर्धेसारखा अनोखा उपक्रम राबवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील पहिली महापालिका असल्याची चर्चाही सोशल मीडियावर आहे. आतापर्यंत कर वसुलीसाठी विविध महानगरपालिकांनी थकबाकीदारांच्या दारामध्ये जाऊन ढोल वाजवण्यासारखे उपक्रम केले आहेत. परंतु या पारंपारिक गोष्टींपासून थोडासा वेगळा उपक्रम मीम स्पर्धेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबवला आहे. त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळत आहे.