विरोधकांची ताकद बरोबरीत, भाजपला लढाई सोपी नाही

0
301

चिंचवड दि. ७ (पीसीबी) : चिंचवड पोटनिवडणुकित भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप, महाआघाडीतून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेनेचे अपक्ष राहुल कलाटे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत, असे किमान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसाचे चित्र आहे. आप, एमआयएम असे अन्य पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज असले तरी ते अद्याप कुठेही शर्यतीत दिसत नाहीत. सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा आजवरच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये त्या त्यावेळच्या प्रमुख उमेदवार पडलेली मते पाहता बरोबरीत विरोधकांची भरभक्कम ताकद असल्याने भाजपला ही लढाई वाटते तितकी सोपी नाही. भाजपचे विरोधक एकत्र लढले तर भाजपचा पराभव सहज शक्य आहे, पण मतांची विभागनी झालीच तर पुन्हा एकदा भाजपला लॉटरी लागू शकते, असे प्रथमदर्शनी दिसते. आमदार जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी म्हणून श्रीमती अश्विनीताई जगताप यांना काही अंशी सहानुभूती मिळेलही, पण प्रचाराची राळ उडाल्यावर मात्र शेवपर्यंत ती टिकेल का याबाबत आताच साशंकता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात ही पहिलीच विधानसभेची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची असेल, असा अंदाज आहे. लक्ष्मण जगताप हे प्रथम अपक्ष, नंतर दोन वेळा भाजपकडून आमदार झाले. नरेंद्र मोदींची लाट आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ यामुळे २०१७ मध्ये जगताप यांनी थेट अजित पवार यांच्याशी पंगा घेत महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. मावळ लोकसभेलाही अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांचा दारुण पराभव घडवून आणला. त्यानंतरच्या काळात स्वतः जगताप यांचे शहराच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व होते. शहरातून राष्ट्रवादीला हद्दपार करण्याचे खरे श्रेय त्यांनाच जाते. आता जगताप यांच्यासारखे कणखर नेतृत्व नसल्याने भाजप पोरकी आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत, पण जगताप यांचा आवाका, मुरब्बीपणा, संघटनकौशल्य त्यांच्याकडे नाही. त्या तुलनेत अजित पवार यांचे नेतृत्व आणि किमान २५ – ३० दमदार असे स्वयंभू नेते, शेकडो कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादी थोडी सरस आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित अशी सर्व ताकद एकवटल्याने ही लढत रंगतदार होणार आहे.

मतदारसंघाच्या फेररचेनेनंतर चिंचवडची पहिली निवडणूक २००९ मध्ये झाली. त्यावेळी अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना ७८,७४१ मते होती, तर त्यांच्या विरोधातील श्रीरंग बारणे (शिवसेना) यांना ७२,१६६, भाऊसाहेब भोईर (काँग्रेस) यांना २४,६८४, विलास नांदगुडे (अपक्ष) यांना १५,५६१ मते मिळाली होती. अवघ्या सहा हजाराच्या फरकाने जगताप जिंकले होते. त्यांच्या विरोधातील मतांची गोळाबेरीज ही जवळपास १ लाख १५ हजारावर होती.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकित आमदार लक्ष्मण जगताप (भाजप) यांना १ लाख २३ हजार ७८६, राहुल कलाटे (शिवसेना) यांना ६३,४८९, नाना काटे (राष्ट्रवादी) यांना ४२,५५३, कैलास कदम (काँग्रेस) यांना ८,६४३, मोरेश्व भोंडवे (अपक्ष) यांना १३,९५२, तर अनंत कोऱ्हाळे (मनसे) यांना ८,५४३ मते मिळाली होती. त्यावेळी जगताप हे ६० हजार मतांच्या फरकांनी जिंकले, पण विरोधी उमेदवारींची एकूण ममते ही १ लाख ३७ हजारावर होती.

गतवेळी २०१९ मध्ये लक्ष्मण जगताप (भाजप) यांच्या विरोधातील सर्वांनी ठरवून एकास एक अशी दुरंगी लढत केली होती. त्यावेळी जगताप यांना १ लाख ५० हजार ७२३, राहुल कलाटे (सर्वपक्षिय अपक्ष) यांना १ लाख १२ हजार २२५ मते मिळाली. कलाटे यांना मिळालेली त्यावेळची लक्षवेधी मते ही तशी आमदार जगताप यांच्यावरची नाराजी दर्शविणारी होती. विरोधकांची ताकद तिथे कमी पडली आणि अवघ्या ३८ हजाराने आमदार जगताप जिंकले होते.आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदान व एकूण मतांची टक्केवारी ४० टक्क, ४५ टक्के आणि शेवटी ५४ टक्के अशी राहिली. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावली तर भाजपला ही हक्काची जागा राखणे तसे कठिण आहे.

भाजपची सत्वपरिक्षा –
यावेळी आमदार जगताप यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकित श्रीमती अश्विनी जगताप यांना मिळणारी सहानुभूती हीच एकमेव भाजपची जमेची बाजू आहे. या मतदारसंघातील पिण्याच्या पाणी प्रश्नावर तीन हजार हाऊसिंग सोसायट्यामधील मतदार नाराज आहे. अवैध बांधकामांचे नियमीतीकरण, शास्तीकर माफी बाबत भाजप काळात राज्य सरकारने घेतलेले निर्णय प्रत्यक्षात आले नाही म्हणून मध्यमवर्गाची नाराजी कायम आहे. किवळे, मामुर्डी रेडझोनचा नव्याने उपस्थित झालेला मुद्दा या भागातील मतदारांसाठी कळिचा असून त्यावर भाजपची भूमिका हीसुध्दा परिक्षा पाहणारी असेल. आजवरच्या तीनही निवडणुकित सरासरी ५० ते ६० टक्के मतदान झाले होते, मात्र पोटनिवडणुकित ते सुमारे ४०-४५ पर्यंतच असेल, असाही अंदाज आहे. रा.स्व.संघ स्वयंसेवकांनी आजवरच्या तीनही निवडणुकित मनापासून काम केल्याने भाजपला कायम विजय मिळाला, आता काय होणार याची प्रतिक्षा आहे.

काटे, कलाटे यांच्यात मतविभागणी –
राहुल कलाटे यांनी दोन निवडणुका अत्यंत मनापासून लढविल्याने त्यांना मागचा अनुभव आहे. प्रथम शिवसेना आणि नंतर सर्वपक्षांनी मिळून पाठिंबा दिल्याने त्यांना ६३ हजार आणि नंतर १ लाख १२ हजार अशी मते मिळाली होती. आता यावेळी ठाकरे यांची शिवसेना महाआघाडीकडे म्हणजे काटे यांच्या बरोबर आहे आणि अन्य एकही राजकीय पक्ष त्यांच्या मागे नाही. स्वसामर्थ्यावर कलाटे हे किती मते घेतील यावर त्यांची उडी ठरणार आहे. दुसरे महाआघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पूर्वी एकदा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढली तेव्हा ४२ हजार मते घेतली होती. आता राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित अशी गठ्ठा मते त्यांच्या पदरात आहेत. आगामी महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणायची आणि त्यासाठी ही पोटनिवढणूक महत्वाची असल्याने स्वतः अजित पवार तळ ठोकूण आहेत. कलाटे यांनी पवार यांच्या विनंतीला मान दिला तर लढत दुरंगी होईल. दरम्यान, हे आजचे वातावरण असले तरी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.