शिवसेनेचे राहुल कलाटे अपक्ष लढणार

0
244

– महाविकास आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्यावतीने या पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाना काटे आणि भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांच्यात थेट लढत होईल असे वाटत असताना या निवडणुकीत आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे.

शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचं सरकारनामाशी बोलताना सांगितलं. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. सरकारनामाची बोलताना कलाटे म्हणाले, ”महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास मला आहे.”

कलाटे यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019 ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कलाटे यांनी कडवी झुंज दिली होती.

पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक असलेले कलाटे यांच्याकडे पिंपरी चिंचवड मधील शिवसेनेचे गटनेतेपद आहे. कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.