निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये

0
299

नाशिक, दि. ५ (पीसीबी) – पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचं समर्थन असेल, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षांशी संपर्कदेखील केला आहे. याबाबत विचारलं असता, लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असेही ते म्हणाले