जयपूर फूट प्रदान कार्यक्रम संपन्न

0
256

पिंपरी, दि.५ (पीसीबी) -लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ यांचे वतीने जयपूर फूट, कृत्रिम हात, पोलिओ कॅलिपर्स आणि कुबड्या यांचे दिव्यांग व्यक्तींना मोफत वाटप यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२३ रोजी जयपूर फूटचे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांच्या नियोजनानुसार करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने कै. हसमुख मेहता यांनी १९९५ मध्ये सुरू केलेला मोफत जयपूर फूट वाटपाचा कार्यक्रम २८ व्या वर्षीदेखील नियमितपणे नियोजनानुसार संपन्न झाला. त्यासाठी सतत चार दिवस यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी, हॅप्पी जॉईंट क्लिनिक पुणे, साईनाथ रुग्णालय भोसरी, वेदान्त रुग्णालय आणि मोरया रुग्णालय चिंचवड येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मोजमाप आणि नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत नांदेड, लातूर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड इत्यादी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ३०४ दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला. जयपूर फूट आणि तत्सम इतर साहित्यवाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ॲनेस्थेशिया विभागप्रमुख भूलतज्ज्ञ डॉ. मारुती गायकवाड, उपप्रांतपाल सुनील चेकर, माजी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी, माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, राजेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ३२३४ डी-२ मधील २५ क्लबचा तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी, इनरव्हील क्लब ऑफ बाणेर हिल्स, लायन्स क्लब ऑफ पुणे डाउनटाउन, इनरव्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियल तसेच दिलीप सोनीगरा ज्वेलर्स, चिंचवड यांचे मोलाचे आर्थिक साहाय्य लाभले. दामाजी आसबे, नेमीचंद बोरा, श्रीराम भालेराव, अनिल झोपे, प्रतिभा काळे, प्रथमेश काळे, उमा पाटील, मनीषा माने, सीमा पारेख, नीलेश पाटील, दिलीप काकडे तसेच मोरया सेंटरच्या १२ विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. दिलीपसिंग मोहिते, निरा आनंद, अंशुल शर्मा, जॉनी थडानी, हृषीकेश देवरे, सलीम शिकलगार, प्रमोद चौधरी, सिद्धांत माने, दीपा प्रभू, गुरुप्रसाद कनोजिया, हिरामण राठोड, कल्पना राठोड, शोभा कदम इत्यादींनी मोजमाप शिबिरांच्या आयोजनात सहकार्य केले. राजेंद्र काळे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. प्रा. शैलजा सांगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.