फसवणूक प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0
250

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – फसव्या स्कीमने एका व्यावसायिकाचा घात केला. दररोज एक टक्का जास्तीचा नफा मिळेल, असे आमिष दाखविल्याने व्यावसायिकाने चार लाखांची गुंतवणूक केली. मात्र गुंतवलेली रक्कमही परत मिळेना झाल्याने व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. हा प्रकार १२ एप्रिल २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडला.

शशिकांत राजाराम देसाई (वय ५०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने ओथ्री ऑस्सम प्रा ली या कंपनीत गुंतवणूक केल्यास प्रतिदिवस एक टक्का जास्तीचा नफा मिळवून देण्याची स्कीम देसाई यांना सांगितली. त्यावर विश्वास ठेऊन देसाई यांनी चार लाख रुपये गुंतवले. दररोज एक टक्का नफा मिळणाऱ्या स्कीममध्ये पाच वर्षात देसाई यांना त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेतून १० हजार २०० रुपये परत मिळाले. उर्वरित तीन लाख ८९ हजार ८०० रुपये मुद्दल आणि त्यावरील नफा न देता त्यांची आरोपीने फसवणूक केली.