आदित्य जगतापची फेसबूक पोस्ट चिंचवडला चमत्कार घडवणार

0
643

– `जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.`

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर चिंचवड पोटनिवडणुकित भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हा संभ्रम वाढत चालला आहे. जगताप यांच्या धर्मपत्नी आश्विनीताई आणि धाकटे भाऊ शंकरशेठ यांची नावे प्रमुख स्पर्धेत आहेत. नावाची घोषणा होण्यापूर्वीच दोघांनीही भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज घेतला आणि सोशल मीडियावर आपापला प्रचार सुरू केल्याने गोंधळात भर पडली जगताप यांच्या घरातील कलह विकोपाला गेल्याच्या बातम्या पसरल्याने भाजपची भलतीच कोंडी होत गेली आणि विरोधात महाआघाडीतील सर्व इच्छुक जोमाने कामाला लागले. आता याच विषयावर विविध चर्चा सुरू असताना आमदार जगताप यांचे चिरंजीव आदित्य यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.

राजकारणापायी लक्ष्मण भाऊंच्या घरातच वाद सुरू असल्याचे चित्र बातम्यांतून निर्माण झाल्याने त्या दुहिचा फायदा विरधकांनी घेतला. आजवरची महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती विचारात घेता ही निवडणूक बिनविरोध निवडणूक करण्याची भाषा होती ती मागे पडली. देगलूर, कोल्हापूर, नांदेड पोटनिवडणुकिचा वचपा काढायचा आणि चिंचवडमध्ये भाजपचा पाडाव करायचाच अशा वलग्ना सुरू झाल्या. जगताप कुटुंबातच एकवाक्यता नसल्याने आता ही निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आश्विनीताईंना मोठी सहानुभूती आहे म्हणून त्यांनाच संधी द्यावी असा एक मोठा वर्ग भाजपमध्ये आहे, तर आगामी महापालिका जिंकायची असेल तर शंकरशेठ यांना उमेदवारी द्या, असा दुसरा मतप्रवाह आहे. या वादामुळे पूर्णतः भाजपच्या बाजुचे वातावरण होते ते विरोधात गेले. हे प्रकरण चिघळले तर भाजपची हक्काची जागा हातातून जाईल, असे दिसू लागले. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार दिवस बाकी आहेत, पण नाव नक्की होत नसल्याने भाजप कार्यकर्तेसुध्दा सैरभैर झालेले दिसले. अखेर या वादावर आता खुद्द जगताप यांचे चिरंजीव आदित्य यांनी अत्यंत समंजस भूमिका घेत एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये आदित्य याने एकत्र कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात स्वतः आमदार जगताप, त्यांचे दोन्ही भाऊ विजूअण्णा, शंकरशेठ तसेच त्यांच्या धर्मपत्नी आश्विनीताई, भावजया आणि पुतणे आहेत. आदित्यने त्या फोटोखाली एक पोस्ट लिहीली आहे. त्यात तो म्हणतो, `जगातील कोणतीही शक्ती आम्हाला वेगळे करु शकत नाही, आम्ही शेवटपर्यंत एक आहोत.` अत्यंत भावनीक पोस्ट असल्याने आदित्यच्या या मतावर आमदार जगताप समर्थकांनीही ती पोस्ट शेअर आणि लाईक केली आहे. आता या पोस्टचा परिणाम काय होतो, उमेदवारी कोणाला जाहीर होते यासाठी वाट पहावी लागेल.