लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबातील गृहकलह वाढला ? सोशल मीडियात दिर भावजयीत उमेदवारीसाठी रस्सीखेच

0
259

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – चिंचवडचे आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण होत असतानाच कुटुंबातील गृहकलह उफाळून आला आहे. पोटनिवडणुकीसाठी जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप या दोघांनीही प्रबळ दावेदारी केली. उमेदवारीसाठी घमासान सुरु आहे. त्यातच समर्थक दोन गटात विभागले आहेत. अश्विनी जगताप यांनी तर एक पाऊल पुढे टाकत भाजपकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. दोघांच्याही समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, भाजपमध्ये ही रस्सीखेेच सुरु असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना आता अधिक आक्रमक झाल्याचे चित्र असून भाजप उमेदवार कोणीही असले तरी आता माघार नाही, अशी महाआघाडीची भूमिका निश्चित झाली आहे,

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. परंतु, अद्यापही उमेदवार जाहीर झाले नाहीत. भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारीसाठी दावेदारी ठोकली आहे. दोघांकडूनही उमेदवारी मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या दोघांच्या निवडणूक लढविण्याच्या इच्छेमुळे लक्ष्मणभाऊंचे समर्थकही संभ्रमावस्थेत आहेत. समर्थकांचे दोन गट पडले आहेत.

अश्विनी जगताप यांनी थेट भाजपासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर, शंकर जगताप यांनीही कार्यकर्त्याच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज घेतल्याचे सांगण्यात येते. दोघांनीही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखविल्याने पुन्हा जगताप कुटुंबातील वाद समोर आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या दोघांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्यात वेगवेगळ्या टॅगलाईन वापरल्या आहेत.

अश्विनी जगताप यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या इमेजमध्ये “आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा” असा आशय लिहिण्यात आला आहे. तर, शंकर जगताप समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर, “एक ही कार्यकर्ता ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडणार नाही, आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच.” असा आशय लिहिण्यात आला आहे. दोन्ही पोस्टवर भाजपचे चिन्ह आहे. समर्थकांचे सोशल मीडियावर सुरु असलेल्या वॉरमुळे समर्थकांमध्येही दोन गट पडल्याचे समोर आले आहे. आता भाजपची उमेदवारी दोघांपैकी कोणाला मिळते, हा वाद कोणते वळण घेते हे पुढील काही दिवसात दिसेल