चिंचवड, दि. २ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपसाठी नामनिर्देश पत्र विकत घेतलेलं आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर उमेदवारी कोणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांची नावं चर्चेत होती. मात्र अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का? याबाबत राज्यभर चर्चांना उधाण आलेलं आहे.
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. म्हणूनच आता भाजपने ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2019मध्ये पराभूत झालेल्या बंडखोर राहुल कलाटेना या पोटनिवडणुकीत एक लाखांच्या मताधिक्याने अस्मान दाखवायचा निर्धार ही करण्यात आला आहे. यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बालेकिल्ल्यातूनच भाजपने बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. भाजपकडून निवडणुकीसाठी इच्छुक असणारे दिवंगत लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांच्या उपस्थितीत ही बैठक काल (1 फेब्रुवारी) पार पडली. या बैठकीत दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबातच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मग ते उमेदवार अश्विनी वहिनी असो शंकर शेठ त्यांच्यासाठी आपण दिवस-रात्र झटायचं आणि त्यांना निवडून देत लक्ष्मण भाऊंना श्रद्धांजली वाहायची असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर अश्निनी जगताप यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का?,असा प्रश्न निर्माण झाला आहे.