बिगर हिंदू व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याची कर्नाटक राज्यात मागणी

0
277

– धार्मिक मेळ्यात मुस्लिम व्यापाऱ्यांविरोधात ‘बहिष्कार बॅनर’ लागल्याने खळबळ

बेंगळुरु, दि. २ (पीसीबी) : निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. राज्यात जत्रेदरम्यान गैर-हिंदू व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी सुरू झालीये. गुब्बी श्री चन्नबसवेश्वर मंदिराच्या जत्रेत बिगर हिंदू व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं तुमकूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना केलंय. श्री चन्नबसवेश्वर मंदिर मेळा हा तुमकूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रिय मेळ्यांपैकी एक आहे. कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुकाही होणार आहेत, त्यामुळं हा चर्चेचा विषय बनलाय.

या संदर्भात हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मंदिर परिसराच्या 100 मीटर अंतरापर्यंत बिगर हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करू देऊ नये, असं आवाहन केलंय. यापूर्वी 14 जानेवारीला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी मंगळुरु शहराजवळील कवुरू इथं एका धार्मिक मेळ्यावर मुस्लिम व्यापाऱ्यांविरोधात ‘बहिष्कार बॅनर’ लावले होते.

14 ते 18 जानेवारी या कालावधीत धार्मिक मेळा सुरू असतानाच श्री महालिंगेश्वर मंदिराच्या आवारात हे बॅनर लावण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. या बॅनरमध्ये म्हटलं होतं, हिंदू धर्म आणि परंपरा मानणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनाच व्यवसाय करण्याची संधी दिली जाईल. मूर्तीपूजेला ‘हराम’ मानणाऱ्याला इथं थारा नाही, असं बॅनरमध्ये लिहिलं होतं.