पवना, इंद्रायणी, मुळा नदी परिसरातील सर्वेक्षण करणार

0
266

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा या तिन्ही नद्यांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी आणि केमिकलयुक्त सांडपाणी ड्रेनेजलाइनच्या मार्फत थेट नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील तिन्ही नदी काठच्या परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.

शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहत आहेत. या तिन्ही नद्यांमध्ये शहरातील काही कंपन्या मैलामिश्रित सांडपाणी आणि केमिकलयुक्त सांडपाणी ड्रेनेजलाइनच्या मार्फत सोडत आहेत. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकाऱ्यांनी चिखली परिसरात पाहणी केली. त्यानुसार सहा कंपन्यांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त जांभळे म्हणाले, केमिकलयुक्त पाण्यांवर कंपन्यांनी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नद्यांमध्ये मैलामिश्रित सांडपाणी आणि केमिकलयुक्त सांडपाणी सोडण्याचे प्रकार होत आहे. केमिकलयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने सहा कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच तिन्ही नदी काठच्या परिसराचा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यापुढेही थेट नदीत सांडपाणी किंवा केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार आहे.