चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्यासाठी 9 जण इच्छुक – अजित पवार

0
351

पिंपरी दि. ३१ (पीसीबी) – चिंचवड आणि कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी माझ्याकडे आत्तापर्यंत 8 ते 9 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागितली आहे. त्याबद्दल मी इच्छुकांशी समोरा-समोर बोलणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मी निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यामुळे अंधेरीचे उदाहरण देणे कितपत योग्य आहे? प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, मी त्या अँगलने (बिनविरोध) अजिबात विचार करत नाही. उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा केली जाईल.

महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसचे काही मान्यवर आले नव्हते. परंतु, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची प्राथमिक चर्चा झालेली आहे. मी गुरुवार, शुक्रवार पुण्याला येणार आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकी संदर्भात माझ्याकडे आत्तापर्यंत 8 ते 9 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागितली आहे. त्याबद्दल मी इच्छुकांशी समोरा-समोर बोलणार आहे. त्यानंतर मला जे वाटते. त्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठांशी चर्चा करुन आमच्या वरिष्ठांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हीच गोष्ट कसबा पेठ मतदारसंघासंदर्भात केली जाईल. कसब्यात काँग्रेस तयारी करत आहेत. 2019 मध्ये आघाडीच्या जागावाटपात कसब्याची जागा काँग्रेसला जागा सोडली होती. त्यामुळे काँग्रेसने तयारी सुरु केली असेल. त्यासंदर्भातही पुण्यात गेल्यानंतर माझ्या सहका-यांशी आणि काँग्रेसचे पदाधिकारी तयार असतील तर त्यांच्याशी बोलेल, असेही पवार यांनी सांगितले