-खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबतचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यात नागरिकांच्या सूचनांचाही समावेश केला जाईल. आराखडा पूर्ण होताच निविदा प्रसिद्ध करुन गडावर पाणी, स्वच्छातगृह, वाहनतळ, पाय-या दुरुस्त, दर्शन शेड अशा सुविधा भाविकांना देण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
कार्ला गडाच्या विकासासाठी वनविभागाची जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) जिल्हा वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके, सतीश स्रावगे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह सकाळपासून पाहणी केली. मावळमधील वनविभागाची जागा विकासासाठी देण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना दिल्या. भाजपचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, मिलींद बोत्रे आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, ”कार्ला गडावर राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. गडावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही. पाय-यांची दुरावस्था झाली असून वाहनतळाची व्यवस्था नाही. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांचे हाल होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई एकविरा देवी मंदीर परिसराच्या विकासासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. मंदिर परिसरात वनखात्याची जागा आहे”.
”भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी वनखात्याची जागा देण्यास वन विभागाने तत्वता मान्यता दिली. त्यामुळे वाहनतळाची सुविधा होईल. एकविरा देवीकडे जाणा-या पाय-यांची दुरुस्ती केली जाणार आहे. गडावर जाण्यासाठी रोप-वे केला जाणार आहे. त्याचा भाविकांना फायदा होईल. या सुविधा निर्माण करण्यासाठी वन विभागाची जागा घेतली जाणार आहे. वाहनतळ, स्वच्छातगृह उभारणे, भाविकांना सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे. छोट्या व्यावसायिकांना वनखात्याच्या जागेत जागा उपलब्ध करुन देण्याची आराखड्यात तरतूद केली आहे. निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच त्यासंदर्भातील कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील. आगामी काही दिवसात कामे पूर्ण होतील. एमएसआरडीसीच्या माध्यमातून एकविरा देवी परिसराचा कायापालट होईल”, असेही खासदार बारणे म्हणाले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्याचे काम हाती
”मावळ तालुक्यातील कार्ला, लोणावळा भागातील पर्यटनाला चालना, पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी निधी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील टायगर, लायन्स पॉइंटलाही आज भेट दिली. तिथे वनखात्याची अडीच हेक्टर जागा आहे. या जागेत पर्यटकांना आकर्षित करण्याबाबतच्या सुविधा निर्माण करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. राजमाचीला जाणारा रस्ताही वनखात्याच्या जागेतूनच जातो. ही अडीच हेक्टर जागाही वनखात्याची आहे. या जागा विकासासाठी देण्याचे वनविभागाने मान्य केले”.
”त्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. जागा ताब्यात आल्यानंतर मावळातील पर्यटनाला चालना मिळेल. लोणावळ्यात येणा-या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतील. याबाबत लोणावळा नगरपरिषदेच्या अधिका-यांसोबत बुधवारी बैठक होणार आहे. अधिका-यांकडून माहिती घेवून जागा भूसंपादनासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल”, असेही खासदार बारणे यांनी सांगितले. त्याचबरोबर देहूरोड ते किवळे, मामुर्डीला वनखात्याच्या जागेतून जाणा-या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याचीही पाहणी केली. नागरिकांना 30 फुटाचा रस्ता पाहिजे. त्याबाबतचा प्रस्ताव वनखात्याकडे पाठविला जाईल. वनखाते तत्काळ महापालिकेकडे जागा हस्तांतरित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.