चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन रस्सीखेच

0
308

चिंचवड ,दि. २४ (पीसीबी) :- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येताच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. ही पोटनिवडणूक आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची लिटमस टेस्ट असल्याने सर्वच पक्षांनी निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याने बिनविरोधाची शक्यता संपली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, महाविकास आघाडी एकत्रित लढून एकच उमेदवार देतात की स्वतंत्र लढतात हे 7 फेब्रुवारीपर्यंत समोर येईल.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा आहे. चिंचवडमध्ये 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. त 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरविणार आहेत.

चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांना माणनारा मोठा वर्ग होता. त्यांचा करिष्मा होता. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असल्याचे सांगितले जाते. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप याही ‘निवडणूक लढवू इच्छितात. उमेदवारीसाठी दोघांच्या नावाची भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे. जगताप यांच्या घरातच उमेदवारीसाठी मोठे घमासान सुरु असल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. शंकरशेठ यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये फूट पाडण्याची शक्यता असल्याने निर्णय घेणे कठीण झाले आहे. थेट दिल्ली तून आयत्यावेळी नाव जाहीर होणार आहे, असे समजले.

चिंचवडची जागा राखणे भाजपसाठी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहे. भाजपचा उमेदवार विजयी झाल्यास सर्वाधिक नगरसेवक निवडणून देणा-या चिंचवडमध्ये पालिका निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असे जाणकार सांगतात. त्यामुळे पक्ष नेमकी कोणाला उमेदवारी देतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी?
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघाची निमिर्ती 2009मध्ये झाली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत पिंपरी, भोसरी राष्ट्रवादीला आणि चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला दिला होता. 2014 ची विधानसभा सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. तर, 2019 च्या निवडणुकीत पिंपरीत राष्ट्रवादीचा उमेदवार होता. चिंचवड आणि भोसरीत अपक्ष उमेदवारांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले होते. आता महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गटही आहे. चिंचवडमध्ये भाजपनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद आहे. या दोनही पक्षांकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. काँग्रेसनेही लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार की स्वतंत्र लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिल्यास भाजपसमोर आव्हान

चिंचवडच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. अपक्ष लढलेल्या कलाटे यांना 1 लाख 12 हजार मते मिळाली होती. कलाटे केवळ 38 हजार 498 मतांनी पराभूत झाले होते. आता समोर लक्ष्मण जगताप हे उमेदवार नसतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना-वंचित बहुजन आघाडीने एकच उमेदवार दिल्यास चुरशीची लढत होईल. भाजपसमोर मोठे आव्हान राहील. महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो

”येत्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. विधानसभेची पोटनिवडणूक लढविली तर निश्चितपणे राष्ट्रवादीचा विजय होवू शकतो. त्यामुळे पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे केला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेकडून सहा जण इच्छुक

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा असा ठराव पक्षाच्या बैठकीत संमत झाला आहे. निवडणूक लढविण्यासाठी सहा जण इच्छुक आहेत. याठिकाणी पूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढविली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली जाईल.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे पाच जण इच्छुक
चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी पाच ज्येष्ठ पदाधिकारी इच्छुक आहेत. इतर पक्षातील इच्छुकांनी देखील संपर्क साधला आहे. पक्षाने उमेदवार दिल्यास मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. उमेदवार देण्याची मागणी पक्षश्रेष्टींपुढे करणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले.