विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने इंद्रायणी थडी रद्द करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

0
365

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – चिंचवड आणि पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण आचारसंहिता असल्याने भोसरी येथे आयोजित करण्यात आलेली इंद्रायणी थडी जत्रा रद्द करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

कसब्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. त्याची आचारसंहिता 18 जानेवारी पासून लागू झाली आहे. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाने जनसंवाद सभाही बंद केली आहे. असे असताना शिवांजली संखी मंचच्या अध्यक्षा पुजा महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित इंद्रायणी थडी- 2023 हा महोत्सव दि. 25 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 दरम्यान भोसरी येथील गावजत्रा मैदानात आयोजित केला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून इंद्रायणी थडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इंद्रायणी थडी कार्यक्रमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही जत्रा त्वरीत कार्यक्रम रद्द करण्यात यावी. संपूर्ण पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. जत्रेचा फायदा चिंचवड विधानसभा मतदारसंघ्याच्या पोटनिवडणूकतील उमेदवार यांना होईल म्हणून तक्रार दाखल करण्यात आल्याचे सचिन काळभोर यांनी सांगितले.