कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील आरोप गंभीर, तत्काळ हकालपट्टी करावी – मानव कांबळे

0
239

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत मागील तीन दिवसांपासून दिल्ली मध्ये जंतर-मंतर मार्गावर धरणे आंदोलन सुरु केलेले आहे. सिंग यांच्यावरील आरोप हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. यामुळे देशाच्या संपूर्ण क्रीडा विश्वाची मान खाली गेली आहे. सिंग यांची अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केली आहे.

याबाबत मानव कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील अनेक दिवसांपासून क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय पदाधिकारी आणि प्रशिक्षकांवर खेळाडूंकडून असे आरोप वारंवार केले जात आहेत. परंतु, खेळातील राजकारणामुळे व आर्थिक हितसंबंधांमुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा अनुभव आहे. महिला पैलवान विनिषा फोगाट यांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक महिला व पुरुष पैलवानांनी सहभाग घेतला आहे. या सर्व खेळाडूंनी जागतिक पातळीवर पदके जिंकून अंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा व तिरंग्याचा सन्मान वाढवलेला आहे. अशा खेळाडूंनी मागणी करूनही देशाचे क्रीडा मंत्रालय जर दोषी व्यक्तीवर कारवाई करत नसेल तर ते अतिशय लांच्छनास्पद आहे.

अखिल भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्राच्या क्रीडा मंत्रालयाला अधिकार नाहीत, असे सांगितले जाते. परंतु, राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनला ते अधिकार आहेत. राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा ज्येष्ठ खेळाडू पी.टी. उषा आहेत. त्या स्वत: एक महिला आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ब्रिजभूषण सिंग यांची अध्यक्ष पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. नैतिकतेच्या आधारावर आरोप झाल्यानंतर तातडीने ब्रिजभूषण सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास पाहिजे होता. परंतु ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्याला नैतिकतेचे कुठलीही ‘चाड’ नाही हे सर्वश्रुत आहे.

त्यामुळे राष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशननेच त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. देशातील सर्व खेळाडूंनी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी विनिषा फोगाट आणि त्यांच्या सहकारी खेळाडूंनी केलेल्या आंदोलनास पाठींबा द्यावा, व त्याद्वारे क्रीडा क्षेत्राला लागलेली ‘कीड’ समूळ नष्ट करण्यात योगदान द्यावे असे आवाहनही कांबळे यांनी केले.