महापालिकेच्या सर्व कार्यालयांत, सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर बंधनकारक

0
250

पिंपरी, दि.१७ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करण्याबाबतचे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी निर्गमित केले आहे.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 14 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या परिपत्रकास अनुसरुन महापालिका कार्यालयात मराठी मधील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने तसेच कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या नस्ती किंवा धारिका कुठल्याही संगणकावर वाचता याव्यात आणि त्या भविष्यासाठी व्यवस्थित रित्या जतन करणे सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता सर्व महानगरपालिका कार्यालयांमध्ये युनिकोड मराठीचा वापर अनिवार्य करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांत तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये मराठी युनिकोडचा वापर करणे शक्य व्हावे, याकरिता महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागास प्रशिक्षण घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.