पिंपरी, दि.१६ (पीसीबी)- हेल्मेट, सीटबेल्टचा वापर, सिग्नल जम्पिंग, राँग साइड वाहन चालविणे अशा कॉमन नियमांकडे दुर्लक्ष म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान व वाहतूक विभागातर्फे मकरसंक्रांती व वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यमाचा वेष परिधान करून हेल्मेट व इतर वाहतूक नियमांबद्दल जन जागृती करण्यात आली.
वाहतूक नियम पाळा व यम टाळा असा संदेश वाहन चालकांना तिळगुळ देण्यात येत होता. शहरातील विविध चौकात प्रतिष्ठानच्या सदस्या आणि वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना तिळगूळासोबत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देऊन मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (चिंचवड) प्रदीप पाटील ,(निगडी )विजया कारंडे व पिंपरी विभागाचे अर्जुन पवार , प्रतिष्ठान च्या अध्यक्षा निर्मला जगताप ,नंदू पत्की , निरजा देशपांडे , कांचन राजकर व वाहतूक विभागातील कर्मचारी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.