बावधन, एमआयडीसी भोसरी मधून तीन पिस्टल, सात काडतुसे जप्त

0
288

हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल, सहा काडतुसे जप्त करण्यात आली. तर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून एकास अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक काडतूस जप्त केले.

संदीप अनंता भुंडे (वय २९, रा. बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बावधन बुद्रुक येथे एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती मिळाल्याने दरोडा विरोधी पथकाने सापळा लावून संदीप याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. ७० हजारांचे पिस्टल आणि १८०० रुपयांची काडतुसे पोलिसांनी जप्त करत संदीप याला अटक केली.

अभिषेक युवराज कांबळे (वय २२, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एमआयडीसी मधील हॉटेल जंजीर समोरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजारांचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार भागवत शेप यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.