ईडी, सीबीआय कारवायांना राजकीय रंग

0
216

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विविध ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली. यावरुन आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी थेट आपल्या आधीच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत त्यांना देशातील कुठल्याही व्यक्तींची पूर्ण चौकशीचे अधिकार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अधिकारातील चौकशी यंत्रणांना देखील चौकशीचे अधिकार आहेत. पण आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका उपस्थित होतं आहे. मधल्या काळात अनिल देशमुखांवर आरोप झाले पण त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नव्हते, त्यामुळं कोर्टानं त्यांना सोडलं. तसेच संजय राऊतांबाबतही हेच घडलं त्यामुळं अशा कारवाया महाराष्ट्र आणि भारताला परवडणाऱ्या नाहीत”

काही मान्यवरांनी जे पूर्वी आमच्याबरोबर होते ते आता सत्ताधारी पक्षाबरोबर गेले. तर आता त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत की, “आम्ही आता सत्ताधारी पक्षात आल्यामुळं आम्हाला शांत झोप लागते” मागे हर्षवर्धन पाटील जे आधी काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपमध्ये आहेत त्यांनी असं विधान केलं होतं. त्यापूर्वी सांगलीच्या एका खासदारांनी असंच विधान केलं होतं. अशी वक्तव्ये आल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होते. त्यामुळं नियम कायदा सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत, असंही पवार यांनी म्हटलं आहे.