हिंदु राष्ट्र जागृती सभेत धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी कृतीशील होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार

0
203

हिंदूंवर होणारे आघात संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता – सुनील घनवट

हडपसर, दि. ८ (पीसीबी) – सद्यस्थितीत हिंदु धर्मावर लव्ह जिहाद, हलाल जिहाद, लॅण्ड जिहाद, फूड जिहाद, काश्मिरी हिंदूंच्या वेचून वेचून होणाऱ्या हत्या अर्थात् टार्गेट किलिंग, गड-दुर्गांचे इस्लामीकरण, गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण, धर्मांतरण आदी विविध आघात होत आहेत. केवळ राष्ट्रीय पातळीवर नाही, तर गावपातळीवर भारतविरोधी गट सक्रीय आहेत. हिंदूंपुढे आता ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ असा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच हिंदूंवर होणारे आघात संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कृतीशील होण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 8 जानेवारी या दिवशी येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सभेला 8 सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. सभेनिमित्त 7 जानेवारी या दिवशी घेण्यात आलेल्या वाहन फेरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘लव्ह जिहाद’ला मुली बळी पडू नये यासाठी मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण द्या – सौ. भक्ती डाफळे, रणरागिणी शाखा

रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, सध्या भारताची राजधानी देहलीत आफताब अमीन पूनावालाने हिंदु युवती श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्याची घटना चर्चेत आहे. या घटनेमुळे परत एकदा देशात ‘लव्ह जिहाद’ची चर्चा चालू झाली. श्रद्धाची हत्या हे एकमव प्रकरण नसून निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर आदी अनेक हिंदु तरुणी याला बळी पडल्या आहेत. धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू असून आता आपल्या दारापर्यंत येऊन ठेपला आहे. याची भयावहता एवढी आहे की, आज देशातील 9 राज्यांना ‘लव्ह जिहाद’ च्या विरोधात कायदा करावा लागला. ‘लव्ह जिहाद’ला आपली मुलगी बळी पडू नये, असे वाटत असेल, तर मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण द्या. जेव्हा हिंदु युवती धर्माचरणी होतील त्याचवेळी असे प्रकार पूर्णपणे थांबतील.

हिंदु राष्ट्राची चळवळ पुढे नेण्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हवे – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘धर्माचरणाचा -हास होऊन अधर्म बळावला की, पृथ्वीवर संकटे येतात’. कोरोना महामारीच्या निमित्ताने २ वर्षे हा आपत्काळ सर्वांनीच अनुभवला आहे. आज कित्येक देशांमध्ये महागाई इतकी टोकाला गेली आहे की, तेथील अर्थव्यवस्था जवळपास कोलमडली आहे. इंग्लंडसारखा देशही आर्थिक मंदीमुळे मेटाकुटीला आला आहे. भूकंप, उष्णतेची लाट, अतीवृष्टी, टोळधाड यांसारख्या नैसर्गिक संकटांचीही मालिका चालू झाली आहे. हिंदु राष्ट्राची चळवळ जर आपल्याला पुढे न्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला भगवंताचे, अर्थात उपासनेचे, साधनेचे अधिष्ठान हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आई तुळजाभवानीची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. आपत्काळाचा सामना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला वेग अन् बळ मिळण्यासाठी आपण प्रतिदिन साधना करण्याचा निश्चय करायला हवा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

सभेचा प्रारंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलन करून आणि वेदमंत्र पठणाने झाला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. उपस्थितांमध्ये वीरश्री जागवणार्‍या या सभेचे सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले.