शिंदे सरकारचा उद्याच होणार निकाल

0
271

– सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे डोळे

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा होता अशी आमची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस शिंदे सरकारवर नक्कीच हातोडा पडेल, असं सांगतानाच उद्याच्या निर्णायकडे आम्हीही अपेक्षेने पाहत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत दिल्लीत आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधाना केलं आहे. ज्या पद्धतीने पक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला ते घटनेच्या कोणत्या नियमात बसतं? अशा प्रकारे घटनेची मोडतोड करून राज्यात सरकारं पाडण्यात आली आणि बसवण्यात आली. असंच सुरू राहिलं तर देशात घटनाच अस्तित्वात राहणार नाही. न्यायालयाचं महत्त्व राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे. ज्यांनी पक्षांतर केलं. घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. त्यांचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर आहे. त्यामुळे महाशक्ती विरुद्ध घटना असा सामना आहे. आम्ही न्यायालयाला मानतो त्यामुळे आमची मागणी योग्य आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

दुर्देवाने आजचं मरण उद्यावर ढललंल जात आहे. बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेवर राहता कामा नये हा निर्णय कोर्टाकडून अपेक्षित होता. आजही आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे आम्ही अपेक्षेने पाहतो आहे, असंही ते म्हणाले.

देशाच्या न्यायव्यवस्थेत काय सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे. पण कोर्टात अजून सत्त्व आणि तत्त्व टिकून आहे. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस या सरकारवर हातोडा पडेल. तो दिवस नक्कीच येईल, असंही ते म्हणाले.