लक्ष्मण जगातप यांच्या कुटुंबियांचे सांत्वनासाठी नेत्यांची गर्दी

0
267

– राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : चिंचवडचे भाजप आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने नुकतेच (ता.३) निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील (पिंपळे गुरव येथील) निवासस्थानी जाऊन सर्वपक्षीय नेत्यांकडून जगतापांच्या कुटुंबियां चे सांत्वन सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जगतापांच्या कुटुंबियांची (ता.६) भेट घेऊन त्यांना धीर दिला.विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच (ता.५) जगताप कुटुंबाची प्रत्यक्ष विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांनी स्व.आ. जगतापांच्या पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीची आठवण सांगितली होती. आज शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील त्यांच्यासोबत होते.

शरद पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. दुःखातून सावरण्यासाठी त्यांना धीर दिला. यावेळी दिवंगत आ. जगतापांच्या पत्नी अश्विनी, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप, त्यांच्या बहिणी व इतर नातेवाईक उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार यांच्या अगोदर आज राज्य़ाचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन , खासदार धनंजय महाडीक, आमदार निलेश लंके, मेघना साकोरे-बोर्डीकर, मोनिका राजळे, प्रसाद लाड, माजी खासदार अमर साबळे आदींनी जगताप कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.