लांडेवाडी (मंचर), दि. ७ (पीसीबी) – शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर मी थांबलो नाही, किंवा घरात बसलो नाही. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला सगळे माहिती आहे. मला नवीन बळ आल आहे. असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माद्यमातून गेल्या तीन महिन्यात २९ कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी प्राप्त झाला. सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जनतेच्या पाठिंब्यावर मी मैदानात असेल, असे संकेत त्यांनी दिले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.७) रात्री राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कवी संमेलनात आढळराव पाटील बोलत होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व भाजपचे मतदार संघातील दिग्गज नेते उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले ”लांडेवाडी येथे १९८७ मध्ये भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दोन वर्ग खोल्यांमध्ये मराठी माध्यमाची शाळा सुरु केली. त्यानंतर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न साकार झाले. प्रशस्त उभारलेल्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवरील खेळाडू तयार करण्याचे काम सुरु आहे.
२००४ मध्ये पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मी विजयी झालो होतो. अभिमानाने सांगावेसे वाटते की, गेली १५ वर्ष खासदार असताना अनेक विकास कामे मार्गी लावली. २०१९ च्या निवडणुकीत अपयश आले तरीही जनतेशी संपर्क ठेऊन कामे करण्यावरच भर दिला. भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या महाभयंकर संकटातही धीर देऊन गरजूंना मदतीचा हात दिला. सहा महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास कामांना चालना मिळाली.
काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार असताना जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मला तीन ते चार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळालाच नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, नवीन सरकार आले तर पहिल्याच नियोजन मंडळाच्या बैठकीत मतदार संघासाठी २९ कोटी रुपयांचा निधी मिळाला. खेड पंचायत समिती इमारतीचा प्रश्न महाराष्ट्रभर गाजला. या इमारतीसाठी १४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. गेली अडीच वर्ष आघाडी सरकारच्या काळात जे साध्य झाले नाही ते गेल्या तीन महिन्यांमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा माध्यमातून झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे मला बळ आले आहे
या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे (BJP) नेते शरद बुट्टे पाटील, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, बाबू थोरात, शिवसेना नेते अरुण गिरे, सुनिल बाणखेले, रवींद्र करंजखेले, भगवानराव पोखरकर, अशोकराव भुजबळ, प्रवीण थोरात, अशोक बाजारे, सागर काजळे, सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार डि. के वळसे पाटील, राजेंद्र सांडभोर, भरत पचगे, सुरेश वाणी, कोंडी भाऊ पाचारणे आदी पत्रकारांचा प्रातिनिधिकस्वरूपात सत्कार करण्यात आला.










































