डिजिटल युगात नवी आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सजग राहावे – ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर

0
187

शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे. सोशल मीडियाने जग पादाक्रांत केले आहे. आगामी काळ हा डिजिटल वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सजग व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले.
भारतीय पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने शहरातील विविध वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

नखाते यांच्या काळेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, डी. एम. कोळी, गोरख पाटील निलंगेकर, नरसिंग माने, सुभाष लोंढे, एकनाथ काटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढारी वृत्तपत्राचे वितरण व्यवस्थापक विजय जाधव, रोखठोक न्यूजचे गणेश हुंबे, दै. पुण्यनगरीचे भूषण नांदूरकर, दै. सकाळचे रवी जगधने, तसेच मंगेश सोनटक्के ,लीना माने, संतोष जराड, दीपक साबळे, महावीर जाधव, संतोष गोटावळे या पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार सातुर्डेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारीताही ध्येयाने प्रेरित होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी झिजवली. स्वातंत्र्योत्तर काळात बराच काळपर्यंत लोकांना आदर्श लोकशाहीचे धडे देण्यासाठी तसेच विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी पत्रकारिता केली गेली मात्र गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेला बाजारी स्वरूप आले आहे. जाहिरातीवर आधारित बातम्या अन पेड न्यूज मुळे लोकांना खरे काय ते कळेनासे झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्र व सोशल मीडिया यांचा झगमगाट वाढला आहे मात्र पत्रकारितेचा आत्मा हरवला असल्याची खंत सातुर्डेकर यांनी व्यक्त केली