सांस्कृतीक जडणघडणीमध्ये संतांचा, त्यांच्या साहित्याचा मोठा वाटा – शरद पवार

0
230

पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) – ”महाराष्ट्राच्या सांस्कृतीक जडणघडणीमध्ये संतांचा, त्यांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. संत, महात्म्यांनी भागवत धर्माची पथाका मिरविली. त्यातून समता, बंधुत्व, अहिंसा, सहिष्णूता इत्यादी विचाराचा प्रसार केला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे ‘शोध मराठी मनाचा’ हे 18 वे जागतिक मराठी संमेलन आज (शुक्रवार) पासून सुरू झाले. संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार 2023 आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई- ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख, स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील, दिग्दर्शक जब्बार पटेल, नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, उद्योगपती अरुण फिरोदिया आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ”संत तुकाराम महाराज यांच्यावर उल्हास पाटील नावाच्या गृहस्थाने एक अतिशय चांगले पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये तुकाराम महाराजांचे सगळे अभंग, त्याच्या खाली त्याचे निरुपण लिहिले आहे. त्यातील अनेक अभंग वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की संत तुकाराम महाराज हे विज्ञानाचा, आधुनिकतेचा विचार त्याकाळात करत होते. अन्याय, अत्याचाराविरोधात कठोर शब्द वापरत होते.

मराठी भाषेचा व्यवहारात अधिकाधिक वापर व्हावा. तिचा अधिकाधिक प्रसार व्हावा. मराठी भाषेच्या कोणत्या बोली बोलाव्यात. कोणत्या बोलीला प्रमाण माणावे. दर 10 मैलाला भाषा, पाणी, वाणी बदलते. मराठी भाषेत व-हाडी, कोकणी, कोल्हापुरी, बेळगावी, मारवाडी तसेच आदिवासी भागात गोंदीण, कातकरी आदी अनेक प्रकारचे उपप्रकार तयार झालेले दिसतात. परंतु, दर 10 मैलाला होणारा भाषेवरचा वेगळा संस्कार हा अपभ्रंश न समजता तो भाषेच्या सौंदर्यात भर घालणारा दागिना समजावा. त्याला मापदंड लावून त्याच्या शुद्धीकरणाच्या भानगडीत फार पडू नये. काही झाले तरी तिची मुख्य भाषेची नाळ जोडलेली असते. त्यामुळे भाषेचा प्रसार होण्यासाठी भाषा अंगवळणी पडणे महत्वाचे आहे. त्यासाठी ती लवचिक असायला हवी. बोली भाषा लवचिकता जपते, जे लवचिक असते. त्याचा प्रसार सुलभ असतो. त्यामुळे बोली भाषेच्या प्रसाराला वाव द्यायला पाहिजे. त्याची काही ठिकाणी टिंगलटवाळी सुद्धा केली जाते. ती टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

”मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण नेहमी बोलत असतो. 30 वर्षापूर्वी जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली. मराठी माणूस जगाच्या कानाकोप-यात पोहोचताना विचाराची सांगड घालावी. मराठी भाषा, संस्कृतीची जपणूक व्हावी. मराठी भाषेचा प्रसार व्हावा म्हणून जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली. परिषदेचे पहिले अधिवेशन मुंबईला झाले. दिल्ली, मॉरिसेस, हैद्राबाद येथे संमेलन झाले. त्याला मराठी मानसाने प्रंचड प्रेम दिले. अलीकडच्या काळात इतर उद्योगात आम्ही लोक पडल्यामुळे सांस्कृतीक क्षेत्राकडे आमच्या सारख्याची थोडी दूरी झाली आहे. पुढील संमेलन गोव्यात घेण्यासाठी परवानगी द्यावी. गोवेकरांनी मराठी भाषा जतन करण्याचे काम केले”, असेही पवार म्हणाले.