जागतिक मराठी संमेलनाचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

0
238

पिंपरी, दि.7(पीसीबी) – मराठी भाषा संवर्धनासाठी लावलेले हे संमेलनाचे रोपटे भाषेला सौंदर्याचा दागिना समजावे असे पतीपावन ज्येष्ठ नेते पदमविभूषण शरद पवार यांनी आज केले.

जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी पवार बोलत होते. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उद्योगपती अरुण फिरोदिया, खासदार श्रीनिवास पाटील, दिग्दर्शक नागराज मंजुळे, यशवंतराव गडाख, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उदय फड , गिरीश गांधी, जयराज साळसगावकर, मोहन गोरे, रवींद्र डोमाळे , माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.

पिंपरी येथील संत तुकाराम नगर परिसरात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आवारातील प्रेक्षागृहात आयोजित या संमेलनाला नागरिकांची प्रचंड गर्दी होती.

याप्रसंगी २०२३ चा जागतिक मराठी भूषण पुरस्कार प्राज उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी तर विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई यांच्या वतीने दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आपल्या भाषणात शरद पवार यांनी पुढील संमेलन गोव्यात होणार असल्याची घोषणा करत मराठीचा प्रसार व्हावा व भाषेचा लहेजा बदलत असला तरी ,मराठी बोलीभाषा प्रमाण मानावी असे म्हटले. भाषेची लौकिकता व भाषेच्या प्रसाराला वाव द्यायला हवा. याप्रसंगी पवार यांनी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाला झालेला विरोध व त्यावर आपण केलेली मात हा प्रसंग सांगितला.

आपल्या भाषणात संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी भाषिक प्रांतरचना झाली आणि मराठी मनाची सीमा तयार झाली. वैचारिक सीमा आणि कार्य करण्याची सीमा मर्यादित झाल्या आहेत. महाराष्ट्राने देशाला वैचारिक नेतृत्त्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सुशीलकुमार शिंदे, श्रीनिवास पाटील यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे स्वागतपद प्रस्तावना या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.