लोणावळ्यातील विविध विकास कामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
269

लोणावळा, दि. ६ (पीसीबी) – खासदार स्थानिक विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरात विविध विकास कामे हाती घेतली आहेत. मुख्य चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण आणि रायवुड पार्क गार्डन नूतनीकरणाच्या विकास कामाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,शर्वरी गावंडे,सुनिल हगवणे,अंकुश देशमुख,विशाल हुलावळे,दत्ता केदारी,सुनिल मोरे आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “लोणावळा मोठे पर्यटन स्थळ आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातील पर्यटक लोणावळ्यात येतात. पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. पर्यटनामुळे लोणावळ्यातील अर्थकरणाही चालना मिळते. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लोणावळ्याच्या विकासासाठी निधी कमू पडू देणार नाही. माझा खासदार निधीही लोणावळ्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. लोणावळा शहर स्वच्छतेबाबतही चांगली कामगिरी करत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या माध्यमातून लोणावळा शहर आणखी चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल”.