१८ वे जागतिक मराठी संमेलन

0
312

दिनांक ६ जानेवारी रोजी उद्घाटन – पूर्वतयारी पूर्ण

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६,७, व ८ जानेवारी या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ या १८ वे जागतिक मराठी संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त डी. वाय.पाटील विद्यापीठ प्रेक्षागृहाचे सर्व आवार सजविण्यात आले आहे. प्रवेशद्वाराची भव्य कमान, सुंदर रांगोळी व फुलांची आरास याबरोबरच मुख्य इमारतीपर्यंत सेल्फी-पॉईंट्स, स्वागताचे बोर्ड्स व झालर उभारण्यात आली असून सनई, वाजंत्री अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पिंपरीमध्ये कार्यक्रम स्थळाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. देशातील व परदेशातील सर्व पाहुण्यांचे कुमकुम तिलक लावून व ओवाळून स्वागत केले जाणार आहे. देशातील व परदेशातील बहुसंख्य निमंत्रित पाहुणे पुण्यात पोहोचले असून परदेशी पाहुण्यांची व्यवस्था हेल्टन हॉटेल येथे आणि देशातील पाहुण्यांची व्यवस्था फन हॉटेल येथे करण्यात आली आहे. याशिवाय डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या हॉस्टेल्समध्येही निवासासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या स्टेजवर आकर्षक इलेक्ट्रॉनिक बोर्डने बॅकड्रोप सजविण्यात आला आहे. तसेच जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, मिडिया रूम आदि व्यवस्था पूर्ण झाली आहे. सर्व भागात उत्तम सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली.

या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड, या देशांमधील मराठी मान्यवर सहभागी झाले आहेत.
या संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई- ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाई जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, नागराज मंजुळे, अभिनेते सयाजी शिंदे, उद्योगपती अरुण फिरोदिया, हणमंतराव गायकवाड आणि परदेशातील व महाराष्ट्रातील निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

उद्घाटन सोहळ्यापूर्वी दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी २:०० वाजता ‘समुद्रापलीकडे’- भाग-१ हा परदेशस्थ मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हैद्राबाद (तेलंगणा राज्य) पोलीस आयुक्त महेश भागवत यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये मनोज शिंदे (अमेरिका), आर्या तावरे (ब्रिटन), भरत गीते (जर्मनी), राजेश बाहेती (दुबई), रोहिदास आरोटे (दक्षिण कोरिया), वृंदा ठाकूर (नेदरलँड्स), विद्या जोशी (अमेरिका), ब्रायन परेरा (ऑस्ट्रेलिया) आदी मान्यवर सहभागी होणार असून त्यांच्याशी सचिन इटकर संवाद साधतील.
याच दिवशी दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी ३:३० वाजता प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व उद्योगपती डॉ.प्रमोद चौधरी यांची मुलाखत होणार असून त्यांच्याशी प्रा.मिलिंद जोशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सायं. ६:३० वाजता ‘कलावंतांच्या सामाजिक जाणिवा’ या कार्यक्रमात दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, अभिनेते आकाश ठोसर आणि अभिनेते सयाजी शिंदे सहभागी होणार आहेत.
या जागतिक मराठी संमेलनासाठी प्रवेशिका आवश्यक असून या प्रवेशिका डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे या कार्यक्रम स्थळी उपलब्ध असतील.