भगवा भाजपसाठी भोगाचे प्रतीक – विद्या चव्हाण

0
236

पुणे , दि. ५ (पीसीबी) – बेरोजगारी, प्रचंड वाढलेल्या महागाईकडील सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून हिंदू धर्म खत-यात असल्याचे सांगत भगवी वस्त्रे परिधान करून मोर्चे काढले जात आहेत. भाजपने धर्माच्या नावाने सुरू केलेले ढोंग थांबवावे. भगवा त्यागाचे प्रतीक आहे. पण, भाजपसाठी हा भगवा भोगाचे प्रतीक झाल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आमदार विद्या चव्हाण यांनी सोडले.

राष्ट्रवीदीची जन जागर यात्रा आज (गुरुवारी) पिंपरी- चिंचवड शहरात आली. थेरगाव येथे चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निरीक्षक डॉ. आशा मिरगे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, देशात, महाराष्ट्रात प्रचंड महागाई वाढली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. याकडील जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी भाजपकडून कोण, कोणते कपडे घालते. कोण कोणाला काय म्हटले असे विषय काढले जातात. धर्मा धर्मात भांडणे लावली जात आहेत. हिंदू धर्म खत-यात असल्याचे सांगत भगवी वस्त्रे परिधान करून मोर्चे काढले जात आहेत. भाजपने धर्माच्या नावाने सुरू केलेले ढोंग थांबवावे. महागाई कमी करावी. तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा. शेतक-यांच्या शेत मालाला भाव द्यावा यासाठी आम्ही जन जागर यात्रा काढली आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीमुळे देश बिघडला आहे. अभिनेत्रींचे पाहून मुली वल्गर कपडे परिधान करतात. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीने घातलेल्या कपड्यांवरून कितीही आरडाओरडा केला. तरी, मुली वल्गर कपडे परिधान करुन फिरायच्या थांबणार नाहीत. त्यात फिरणारच आहेत. मुलींनी असे कपडे घालणे चुकीचे आहे. प्रत्येकीने त्याबाबतचा विचार केला पाहिजे. पण, एखादीचे थोबाड फोडण्याची वाघ यांची भाषा योग्य नाही. केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्ड आणला पाहिजे. दिग्दर्शकाला समज दिली पाहिजे. वल्गर कपडे, गाणी लिहिणाऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे. याला-त्याला थोबाडण्यापेक्षा सेन्सॉर बोर्डाला नग्नपणा कमी करायला लावावा, असेही चव्हाण म्हणाल्या.