तोपर्यंत फोन बंद ठेवला आणि लक्ष्मणभाऊ आमदार झाले, अजितदादांनी सांगितला 2004 चा किस्सा

0
210

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 2004 च्या निवडणुकीत मीच लक्ष्मण जगताप यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. तु फॉर्म भर आणि नंतर तुझा मोबाईल बंद कर, फॉर्म काढायची मुदत असेपर्यंत तुझा फोन चालू करायचा नाही, असा माझा निरोप गेल्यावर त्याने (जगताप) तसे केले आणि एकतर्फी निवडणूक लक्ष्मणनने जिंकून पहिल्यांदा आमदार झाल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) सांगितली.

अजित पवार यांनी पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार म्हणाले, पुणे शहराच्या बरोबरीने या शहराला कसे आणता येईल. याबाबतचा सततचा प्रयत्न माझा आणि माझ्या सहका-यांचा राहिला. त्यामध्ये अनेक सहकारी होते. त्यातील एक लक्ष्मण होता. महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौरपद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशी वेगळ्यावेगळ्या प्रकारची पदांची जबाबदारी लक्ष्मण जगताप यांच्यावर टाकली. अतिशय मजबूतीने ती जबाबदारी जगताप यांनी पेलली. नंतरच्या काळात काही राजकीय समिकरणे बदलली. 2014 ला राजकीय घटना घडल्या आणि त्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. परंतु, त्याआधी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून लक्ष्मणला विधानपरिषदेचा आमदार करत असताना असाच एक प्रसंग आला होता.

मी लक्ष्मणला सांगितले की तु फॉर्म भर आणि नंतर तुझा मोबाईल बंद कर, फॉर्म काढायची मुदत असेपर्यंत तुझा फोन चालू करायचा नाही, असा माझा निरोप गेल्यावर त्याने तसे केले. वरिष्ठांचे खूप प्रेशर होते. काँग्रेसचे तिकीट चंदुकाका जगताप यांना मिळाले होते. परंतु, मतदारसंघात आमच्या विचाराचे लोक जास्त होते. मला आमच्या विचाराचा माणूस निवडून आणायचा होता. मला खात्री होती की निवडणुक झाली तर निश्चितपणे मी लक्ष्मणला निवडून आणू शकेल. नंतरच्या काळात निवडणूक झाली. फार एकतर्फी निवडणूक लक्ष्मणनने जिंकली.

त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला. पुन्हा विधानसभेसाठी लक्ष्मणला अपक्ष उभे रहावे लागले. पण, लोकांच्यात काम, कार्यकर्त्यांचा मोठा संच, संघटना कौशल्यामुळे दुसरी निवडणुकही त्याने अपक्ष म्हणून जिंकली. पण, अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर देखील पवार साहेबांच्या, आम्हा लोकांबरोबर तो शेवटपर्यंत राहिला. खासदारकीच्या निवडणुकीत 2014 ला वेगळा प्रसंग उद्भवला. पण, दुर्देवाने त्यात यश मिळाले नाही. त्यामुळे नाऊमेद झाला, खचला होता. त्याला निवडून आणण्यासाठी बराच प्रयत्न केला. पण, यश काही मिळाले नाही. नंतर त्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.