आयुक्तांची सहाय्यक आयुक्ताला समज

0
288

पिंपरी, दि. 5 (पीसीबी)- कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांची दुस-या विभागात बदली केल्यानंतर पुन्हा त्याच विभागात बदली करण्यासाठी शिफारस केल्याने प्रशासन विभागाचा वेळ, श्रम आणि उर्जा नाहक खर्ची झाली आणि हे कृत्य कार्यालयीन शिस्तीशी सुसंगत नसल्याचा ठपका ठेवत सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांना समज देण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी भविष्यात पूर्वीच्या भूमिकेशी विसंगत पत्रव्यवहार कटाक्षाने टाळण्याची समज दिली.

करसंकलन विभाग स्थायी उत्पन्न मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील कामकाचा नागरिकांशी थेट संबंध येतो. कर संकलन विभागातील लिपिक कालिदास शेळके, उन्मेश निकम यांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या दोघांची अन्य विभागात बदली करण्यासाठी सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार शेळके, निकम यांची अन्य विभागात बदली केली. त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले. याबाबतचा आदेश झाल्यानंतर बदलीद्वारे करसंकलन विभागात नेमणूक झालेल्या कर्मचा-यांना कामकाजाचा अनुभव नसल्याने कर वसुलीच्या कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण होईल. अंदाजपत्रकीय वसुलीचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी बदली आदेश रद्द करण्याची शिफारस देशमुख यांनी केली होती.

शेळके, निकम यांची अन्य विभागात बदली केल्यानंतर 5 दिवसानंतर लगेच पुन्हा बदली रद्द करण्याबाबत केलेली शिफारस ही पूर्णपणे विचार न करता केलेली आहे. ही बाब आपल्या सोईनुसार असून सामान्य प्रशासन विभागाचा वेळ, श्रम, उर्जा नाहक खर्ची करणारी आहे. हे कृत्य कार्यालयीन शिस्तीशी सुसंगत असे दिसून येत नाही. त्यामुळे यापुढे आपल्या विभागातील कामकाजाशी संबंधित सामान्य प्रशासन विभागाकडे कोणताही पत्रव्यवहार करताना ठामपणे भूमिका स्पष्ट करावी. एकदा पत्रव्यवहार केल्यानंतर पुन्हा त्याच विषयाच्या कार्यवाहीअंती आपल्या पूर्वीच्या भूमिकेशी विसंगत पत्रव्यवहार कटाक्षाने टाळावा. भविष्यात अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास कर्तव्यात कसूर, वरिष्ठांची दिशाभूल केलेल्या कारणास्तव कारवाई करण्यात येईल, अशी समज देण्यात आली आहे.