गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ; 45 बालकांना गोवरची बाधा

0
228

पिंपरी, दि. 4 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात गोवर रुग्णांची संख्या वाढली आहे. 35 असलेली रुग्ण संख्या 45 वर गेली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत शहरातील 3 हजार 823 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस दिला आहे.

शहरात गोवरचा शिरकाव झाल्यापासून पालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. शहरातील आतापर्यंत 3 लाख 60 हजार 987 घरांचे सर्व्हेक्षण करून 12 लाख 91 हजार 866 नागरिकांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये 5 वर्षांखालील 78 हजार 46 बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. 35 हजार 944 बालकांना व्हिटॅमीन ए ची मात्रा देण्यात आली असून गोवर रुबेला पहिला व दुसरा डोस 3 हजार 823 बालकांना दिला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 478 गोवर संशियत बालके आढळून आली आहेत. तर 45 जणांना गोवरची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.