आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन

0
246

पिंपळे गुरव, दि.4 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर पिंपळेगुरव येथे सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आमदार जगताप यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांची कर्करोगाशी झुंज आज सकाळी अपयशी ठरली. सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्ष्मणभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले.

सायंकाळी फुलांनी सजविलेल्या वाहनातून पिंपळेगुरव येथील निवासस्थान ते गावठाणातील मैदानापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता आमदार जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैरी झाडत पोलिसांनी त्यांना सलामी दिली. लक्ष्मणभाऊ यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे होते. सर्वाधिक कार्यकर्ते सोबत असणारे आणि कार्यकर्त्यांना जपणारे नेते म्हणून भाऊंची ओळख होती. भाऊंच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्काराला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

नगरसेवक ते आमदार –
आमदार लक्ष्मण जगताप यांची नगरसेवक ते चारवेळा आमदार अशी राजकीय कारकिर्द राहिली आहे. जगताप हे 1992 पासून पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सक्रीय होते. चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी पदे त्यांनी भुषविली आहेत. एक वेळ विधान परिषद आमदार आणि सलग तीन वेळा विधानसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द राहिली.