‘या’ घटनेनंतर अजित पवार मित्रपक्षांच्या टार्गेटवर !

0
174

नागपूर, दि. 30 (पीसीबी) -महाविकास आघाडीमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचे दर्शन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बघायला मिळत आहे. विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविरोधात मित्रपक्ष काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे आमदार नाराज असल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेकदा बोलल्या गेलंय. विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सत्ताधाऱ्यांपुढे आक्रमकपणे विरोधी पक्षाची भूमिका मांडत नाहीत, अशी टीका महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खरंच सगळं काही ठीक आहे का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. दरम्यान, जानेवारीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँघ्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बद्दल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना काहीच माहिती नसल्याची बाब समोर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे.

अजित पवार या संदर्भात म्हणाले आहेत की, “मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे..”

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यावर शिंदे गटाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. “अजित पवारांचं वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक आहे..”