नृत्यगीतांमधून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

0
196

पिंपरी, दि. २९(पीसीबी )- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुल, थेरगाव येथील विद्यार्थ्यांनी नृत्यगीतांच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या विविध प्रांतांतील संस्कृतीचे नितांतसुंदर दर्शन घडविले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन 2022-23 या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालवाडी ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. सुभाषचंद्र भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, महाराष्ट्र सरपंच परिषद अध्यक्ष आशिष येळवंडे, ‘सारेगम’फेम गायिका अनघा ढोमसे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, इनरव्हील क्लबच्या प्रीती पाटील, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाला समितीचे नितीन बारणे, डॉ. नीता मोहिते, गतिराम भोईर, पर्यवेक्षक विलास पाटील, शाहीर आसराम कसबे, वासंती तिकोने, वर्षा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. सुभाषचंद्र भोसले म्हणाले की, “भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला देश आहे. देवावर डोळसपणे श्रद्धा ठेवावी, अशी शिकवण मला आईने दिली!” संजय नाईकडे यांनी, “शाळा म्हणजे पैसे कमावण्याचे साधन अशी आजची परिस्थिती असलीतरी गोरगरिबांची शाळा असा लौकिक असलेली खिंवसरा-पाटील शाळा याला अपवाद आहे अन् त्याचा शिक्षणमंडळाला अभिमान आहे!” अनघा ढोमसे यांनी सुरेल आवाजात “पैल तो गे काऊ कोकताहे…” ही ज्ञानेश्वरमाउलींची भक्तिरचना सादर केली. मुख्याध्यापक तथा पालकप्रमुख नटराज जगताप यांनी प्रास्ताविकातून, “बहुतांशी पालकवर्ग हा कनिष्ठ स्तरावरील आणि आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतला असला तरी शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे!” अशी माहिती दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शैक्षणिक संकुलाने बालवाडी ते चौथी आणि पाचवी ते नववी अशा दोन गटांमधून नृत्यगीतांची रेलचेल केली होती. आकर्षक वेषभूषा, सुरेल पार्श्वसंगीत, लयबद्ध सांघिक नृत्याविष्कार, स्वतः विद्यार्थ्यांनी केलेले निवेदन यामुळे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राची लोकधारा, गुजराती गरबा, पंजाबी भांगडा, दाक्षिणात्य शास्त्रीय नृत्ये अशा अभिजात, पारंपरिक नृत्यगीतांसोबतच पाश्चात्त्य शैलीतल्या नृत्यांवर उपस्थितांनी ठेका धरला; तर काश्मिरी पंडितांच्या वेदना, जवानांचे हौतात्म्य आणि सद्य:स्थितीतील भयमुक्त काश्मीरचे अभिमानास्पद दर्शन भारावून टाकणारे होते.

“जय जवान, जय किसान… घडवूया हाताने नवनिर्माण!” या खिंवसरा-पाटील शैक्षणिक संकुलातील शिक्षकवृंदाने सादर केलेल्या सामुदायिक गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुख्याध्यापक तथा पालकप्रमुख नटराज जगताप, बालवाडी विभागप्रमुख आशा हुले, माध्यमिक विभागप्रमुख अश्विनी बाविस्कर, स्मिता जोशी, मंजुषा गोडसे, सुवर्णा देशपांडे, अंजली सुमंत, सुनीता घोडे, नलिनी पंडित, आकांक्षा रोडे, रिया हावळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुनीता सलगर यांनी सूत्रसंचालन केले.