अटकवून ठेवलेली वाहने ७ दिवसांत सोडवून न्या; आरटीओचे आवाहन

0
195

पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील अन्य गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात अटकवून ठेवलेली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवून नेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील अशी वाहने मालक/चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली आहेत. ही वाहने सोडवून नेण्यासाठी वाहन मालकांनी या कार्यालयात वाहन कर, दंड भरलेला नाही अथवा वाहने नेण्यासाठी संपर्क केलेला नाही.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रियादेखील सुरु केलेली आहे. त्यापैकीच १८ वाहनांच्या मालकांना कार्यालयाने नोटीस पाठविल्या होत्या. परंतू वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने अशा नोटीस वाहन मालकांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदलाची नोंद पत्ता बदल झाल्यास ७ दिवसात करावयाची आहे. परंतू वाहन मालकांनी पत्ता बदल न केल्याने वाहन मालकाचे अद्ययावत पत्त्यावर पत्रव्यवहार करणे शक्य होत नाही व वाहन मालकासोबत संपर्क होऊ शकत नाही.

वाहन मालकांनी आपली वाहने मोटार वाहन कर व दंड भरून पुढील ७ दिवसांत सोडवुन न्यावीत, अन्यथा अशी वाहने बेवारस वाहने आहेत समजुन सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अशा वाहनांचा जाहीर ई लिलाव करण्यात येईल असेही पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.