“लहुजी वस्ताद यांच्याशिवाय क्रांतीचा इतिहास अपूर्ण!”

0
323

पिंपरी, दि. २८ (पीसीबी ) “भारतीय क्रांतिकार्याचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांच्या नामोल्लेखाशिवाय अपूर्ण आहे!” असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे यांनी बुधवार, दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी येथे काढले. पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन आयोजित शाहीर आसराम कसबे लिखित ‘आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन ॲड. सतीश गोरडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर, ॲड. अतिश लांडगे, ॲड. बी.के. कांबळे, ॲड. शशिकांत खरात, ॲड. जयश्री कुटे, ॲड. अतुल आडसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतीश गोरडे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘महाराष्ट्राचे शिल्पकार : चरित्र ग्रंथमालिका’ या उपक्रमांतर्गत लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरित्राची निर्मिती केली, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. थोर समाजसुधारक, शैक्षणिक चळवळीचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले हे लहुजी वस्ताद यांच्या तालमीत बलोपासना आणि शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असत यावरून लहुजींच्या कार्याची उंची आपल्या लक्षात येऊ शकते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे निवेदन आणि समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रस्तावना यामुळे या चरित्रग्रंथाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे!” कार्यक्रमाच्या संयोजनात ॲड. अरुण खरात, ॲड. सचिन पाणी, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. रवी कसबे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. सुनील गजभार, ॲड. संजय माने, ॲड. दीपक कांबळे, ॲड. रामराजे भोसले, ॲड. सविता तोडकर, ॲड. स्नेहा कांबळे, ॲड. ऐश्वर्या शिरसाट, ॲड. रूपाली मोरे यांनी सहकार्य केले. पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. महिला सचिव प्रमिला गाडे यांनी आभार मानले.