पिंपरी , दि. २८ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नर्सिंग होम किंवा रुग्णालयांना नोंदणी देताना व दिलेल्या नोंदणीचे विहित मुदतीनंतर नुतनीकरण करताना सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 च्या शासन अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रातील नर्सिंग होम किंवा रुग्णालयांना नोंदणी देताना व दिलेल्या नोंदणीचे विहित मुदतीनंतर नुतनीकरण करताना सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. या विषयास महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती, प्रशासक शेखर सिंह यांनी त्यास मान्यता दिली.
पिंपरी रेल्वे उड्डाणपुलाखालील अस्तित्वातील गाळ्यांचे दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्र.11 कृष्णानगर अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या 23 लाख रुपये खर्चास, प्रभाग क्र.12 अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी 23 लाख रुपये खर्चास, मुंबई पुणे महामार्गावरील दिव्यांची चालन देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणाऱ्या 31 लाख रुपये खर्चास आज मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.30 आणि प्रभाग क्र.20 मधील शौचालय व प्रसाधनगृहे मनुष्यबळ वापरून व यांत्रिकी पध्दतीने तसेच आवश्यक रसायने वापरून ठेकदारी पध्दतीने साफसफाई करण्याकरिता 2 वर्षासाठी 2 कोटी 81 लाख रुपये खर्च होणार आहेत. श्रीनगर टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्रांतील वितरण व्यवस्थेचे पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरुस्ती करण्याकामी 25 लाख रुपये खर्च होणार आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर 23 येथे निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी लिक्विड क्लोरीन वायू पुरविण्यासाठी 1 कोटी 24 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या विविध विषयांना मंजुरी दिली.