मोशीतील इंद्रायणी साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद

0
215

पिंपरी,दि. २६ (पीसीबी) – भरगच्च कार्यक्रम, उत्तम नियोजन आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी, जय गणेश बँक्वेट हॉल, मोशी येथे शनिवार ( दि. २४ डिसेंबर) रोजी इंद्रायणी साहित्य परिषद, मोशी आयोजित पहिले एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले.९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे, ह.भ.प. बाळासाहेब काशीद, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी, ह.भ.प. प्रशांत मोरे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत रवींद्रनाथ टागोर विचारपीठावरून संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. त्यापूर्वी नागेश्वर मंदिर, मोशी येथून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये पारंपरिक वारकरी वेषभूषा परिधान करून आबालवृद्ध सहभागी झाले होते.

उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘राष्ट्रउभारणीत शिक्षकांचे योगदान’ या परिसंवादात शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील अध्यापक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी विधानपरिषद माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार विलास लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. “बहुजन समाजाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असून संतसाहित्यातून राष्ट्रवादाची जोपासना करण्यात आली!” असे मत गिरीश प्रभुणे यांनी परिसंवादाच्या अध्यक्षीय मनोगतातून मांडले. प्रा. एकनाथ बुरसे समन्वयक होते. तिसऱ्या सत्रात नितीन हिरवे यांच्या उपस्थितीत नाना शिवले यांनी रसिकाग्रणी माजी आमदार उल्हास पवार यांच्याशी संवाद साधला असताना, “मतभेद हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण असले तरी आजच्या राजकारणातून मांगल्य, पावित्र्य संपुष्टात आले आहे!” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चौथ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दादाभाऊ गावडे आणि राज अहेरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात सुमारे पंचवीस कवींनी सहभाग घेतला. प्रदीप गांधलीकर यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.

‘श्रमसंस्कृती आणि शब्दसंस्कृतीचा मिलाफ’ या पाचव्या सत्रात संतोष घुले यांनी शिवाजी चाळक यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. सहाव्या सत्रात ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्याशी प्रदीर्घ संवाद साधून संदीप तापकीर यांनी त्यांची संपूर्ण साहित्यिक वाटचाल मांडत असताना, “‘पाटील’ म्हटले की उसाचा, तमाशाचा आणि कुस्त्यांचा फड डोळ्यांपुढे उभा राहतो; परंतु हा ‘पाटील’ शब्दांच्या फडातील आहे!” अशा खुसखुशीत शैलीत विश्वास पाटील यांनी उत्तरे देताना रसिकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रज्ञावंत आणि भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. श्रीकांत चौगुले यांनी पुरस्काराचे निवेदन केले. समारोपाच्या सत्रात, “कृषिसंस्कृती झपाट्याने नामशेष होत आहे आहे; परंतु मराठी भाषेचे वैभव टिकवून ठेवले पाहिजे!” असे आवाहन संमेलनाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी केले. सोपान खुडे, राजेंद्र घावटे यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनादरम्यान अरुण बोऱ्हाडे लिखित ‘भाव, भाषा, भवताल’ (अध्यक्षीय भाषण), ‘अक्षरप्रतिमेतील प्रज्ञावंत’ , ‘राष्ट्रभक्तांची स्मरणगाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या विकास कंद, डॉ. सीमा काळभोर, रामभाऊ सासवडे, डॉ. अहेफाज मुलाणी, अलंकार हिंगे, श्रीहरी तापकीर, सुनील जाधव आणि मोशी ग्रामस्थ यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. पसायदानाने सांगता करण्यात आली.