मद्य उत्पादक कंपनीची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने फसवणूक

0
178

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – मद्य उत्पादन करणाऱ्या काया ब्लेंडर अँड डिस्टिलर प्रा लि या कंपनीची पुणे जिल्ह्याची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका व्यक्तीची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट २०२१ मध्ये मारुंजी येथे घडला.

दत्तू सोमनाथ गवळी (वय ५३, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करून कोरा (रा. पंजाब), रिमझिम मुखर्जी, अजिंक्य अनिल कासारे (वय २८, रा. नांदेड सिटी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काया ब्लेंडर अँड डिस्टिलरी प्रा लि ही मद्य उत्पादक कंपनी आरोपींनी त्यांच्या मालकीची असल्याचे गवळी यांना सांगितले. या कंपनीची पुणे जिल्ह्यासाठी डिलरशिप गवळी यांना देतो, असे आमिष दाखवून डिलरशिपसाठी १५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर झालेल्या करारानुसार कोणत्याही मालाची डिलिव्हरी न देता १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.