महापालिका शाळांमध्ये गणितोत्सव !

0
176

पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज महापालिकांच्या पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा आणि अंगणवाडीमध्ये गणितोत्सव 2022 चे आयोजन करण्यात येणार आले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये गणित विषयाचे महत्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. गणित विषयाचे पूर्वप्राथमिक स्तरापासून कृती आधारित व आनंददायी पद्धतीने अध्यापन व्हावे, यासाठी खेळ आधारित अध्यापणनशास्र, गणितीय खेळ, कोडी आणि परिसरातील गणित यांचा दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत समावेश करावा, याविषयी शैक्षणिक धोरणामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. पायाभूत स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये प्रारंभिक संख्या ज्ञान विषयक कौशल्य विकसित व्हावे, यासाठी राज्यामध्ये निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.

गणितोत्सवची प्रमुख संकल्पना परिसरातील गणित, ही निश्‍चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये गणितोत्सव साजरा करत असताना विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे. गणितोत्सवमध्ये गणित परिपाठ गणित गप्पा, गणितीय रांगोळी, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गणित जत्रा, गणित मेळा आणि गणितीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गणित दिनानिमित्त गणितोत्सव 2022अंतर्गत प्रत्येक शाळा स्तरावर विविध कृतीयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कृतीयुक्त पद्धतीने व परिसराच्या माध्यमातून गणित विषयाचे अध्ययन-अध्यापन केल्याने विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होणार आहे. गणित विषयाची मनातील भीती दूर होऊन निश्‍चितच गणित विषयाच्या गुणवत्ता वाढीस चालना मिळेल, असे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.