“भारतामध्येही…” अर्जेंटिनाच्या रोमहर्षक विजयानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट

0
249

नवी दिल्ली,दि.१९(पीसीबी) – कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्या अत्यंत रोमहर्षक पद्धतीने अर्जेंटिनाने विजय मिळवला. अर्जेटिनाकडे ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मात्र, यानंतर किलियन एम्बापेने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ९७ सेकंदांत दोन गोल करत फ्रान्सला बरोबरी करून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत मेसी आणि एम्बापेने प्रत्येकी एकेक गोल केल्याने सामना ३-३ असा बरोबरीत आला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट झाले. यात मेसी, पाव्लो डिबाला, लिआंड्रो पेरेडेस, गोन्झालो मोन्टिएल यांनी गोल करत अर्जेटिनाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अर्जेंटिना आणि फ्रान्सचे अभिनंदन केले आहे.

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अखेर साकार झाले. रविवारी झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेतील ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ अशी सरशी साधताना अर्जेटिनाने तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. या सामन्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरुन अर्जेंटिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

“हा सामना फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल. विश्वविजेता झालेल्या अर्जेंटिनाचे अभिनंदन! ते संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम खेळले. भारतामधील अर्जेंटिनाचे आणि मेस्सीचे कोट्यावधी चाहते या विजयामुळे सुखावले आहेत,” असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

“फ्रान्सचे अभिनंदन त्यांनी फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फारच उत्तम कामगिरी केली. त्यांनी अंतिम सामन्यात त्यांच्या कौशल्याने आणि खिळाडूवृत्तीने चाहत्यांची मनं जिंकली,” असंही मोदी अन्य एका ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.